
“वारसा समाजसेवेचा, निर्धार रक्तदानाचा” या उदात्त घोषवाक्याने ‘मार्तंडे प्रतिष्ठान’कडून समाजसेवेसाठी नागरिकांना उत्स्फूर्त पणे सहभागी होण्याचे आवाहन.
मार्डी : समाजसेवेची उज्ज्वल परंपरा जपण्यासाठी आणि कै. श्रीधररावजी मार्तंडे यांच्या निस्वार्थ कार्याची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कै. श्रीधररावजी मार्तंडे प्रतिष्ठान, मार्डी’ यांच्या वतीने आयोजित या महत्त्वपूर्ण उपक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन, रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य बजावावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक ०५/०७/२०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मार्डी येथील पेठेतील मारुती मंदिरात हे शिबिर पार पडणार आहे. कै. श्रीधररावजी मार्तंडे यांच्या सेवाभावी वृत्तीचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रतिष्ठानने “वारसा समाजसेवेचा, निर्धार रक्तदानाचा,या घोषवाक्य प्रमाणे या उपक्रमाला एक विशेष महत्त्व दिले आहे.
॥ निश्वयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु ॥ या उक्तीप्रमाणे कै. श्रीधररावजी मार्तंडे यांनी नेहमीच गरजूंना आधार दिला. त्यांच्या याच कार्याची आठवण म्हणून, अविनाश मार्तंडे यांनी या शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने केला आहे. एका रक्तदानातून अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात; त्यामुळे हे रक्तदान म्हणजे केवळ एक दान नसून ते एका नव्या जीवनाचे वरदान आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील,तालुक्यातील,व मार्डी गाव आणि परिसरातील सर्व नागरिकांना या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरुणाई, ज्येष्ठ नागरिक, महिला – अशा सर्वच नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा. हे रक्तदान शिबिर कै. श्रीधररावजी मार्तंडे यांच्या समाजोपयोगी कार्याला आदरांजली वाहण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग ठरेल, असे प्रतिष्ठानने म्हटले आहे. आपल्या एक थेंब रक्ताने कोणाचे तरी जीवन वाचू शकते, हे लक्षात घेऊन सर्वांनी शिबिराला उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.